आता या शेतकऱ्यांना मिळणार तारण कर्ज, जाणून घ्या आताच

shetimaal taran loan yojana

शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे सुगीच्या कालावधीत शेतीमाल एकाच वेळी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला जातो.

त्यामुळे या कालावधीत शेतमालाचे बाजारभाव कमी होतात. शेतमालास योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

मात्र काढणी हंगामात शेतमालाची साठवणूक करुन तो काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीस आणल्यास त्या शेतमालास जादा बाजारभाव मिळू शकतो.

तसेच शेतकऱ्यांस सुगीच्या कालावधीत असलेली आर्थिक निकड विचारात घेऊन त्यांना या गरजेच्यावेळी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.

या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या घेवडा (राजमा), हळद, काजू बी, बेदाणा व सुपारी या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला आहे.

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकुण किंमतीच्या 75 टक्के पर्यंत रक्कम 6 महिने कालावधीसाठी 6 टक्के व्याज दराने तारण कर्ज देण्यात येते.

सदर योजना पणन मंडळाच्या स्वनिधितून बाजार समित्यांमार्फत राबविली जात असुन सहा महिन्यांचे आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना 3 टक्के व्याज सवलत पणन मंडळाकडून देण्यात येते.

तसेच ज्या बाजार समित्या स्वनिधितून तारण कर्ज योजना राबवितात त्यांना त्यांनी वाटप केलेल्या तारण कर्ज रक्कमेवर 3 टक्के व्याज सवलत अनुदान स्वरूपात देण्यात येते.

सोयाबीन, तुर, मुग, उडिद, चना, भात (धान) करडई, सुर्यफूल, हळद, ज्वारी, बाजरी, मका तसेच गहू या शेतमालासाठी एकूण किंमतीच्या 75% रक्कम

वाघ्या घेवडा (राजमा) साठी बाजारभावाच्या 75 टक्के अथवा प्रति क्विंटल रू. 3,000/- या पैकी कमी असणारी रक्कम, काजू बी आणि सुपारी साठी एकूण किंमतीच्या 75% रक्कम अथवा जास्तीत जास्त रु. 100 प्रति किलो

बेदाणासाठी एकुण किंमतीच्या कमाल 75% किंवा जास्तीत जास्त रु. 7,500/- प्रति क्विंटल यातील कमी असणारी रक्कम तारण कर्ज म्हणून बाजार समिती मार्फत देण्यात येते.

या कर्जासाठी व्याज दर हा फक्त 6 टक्के इतका असुन कर्जाची मुदत 6 महिने म्हणजेच 180 दिवस इतकी आहे.

Leave a comment