घरबसल्या जातीचे प्रमाणपत्र कसं काढायचं? अर्ज कुठे करायचा? वाचा सविस्तर

 jaticha dakhla documents in marathi

महाराष्ट्रात किंवा देशातील कोणत्याही राज्यामध्ये शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र सादर करावं लागतं. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ते निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना जातीचे प्रमाणपत्र हे महत्वाचे कागदपत्र मानले जाते. शालेय शिक्षण सुरु असताना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र महाविद्यालीन विद्यार्थी, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आवश्यक असते. (How to get caste certificate from Aaple Sarkar Portal )


जातीचे प्रमाणपत्र ( Caste) कुठे मिळते?

जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते. तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता. आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता.

जातीचे प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा: पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं

पत्ता दर्शवणारा पुरावा :पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, वीज बील, घरफळा पावती, सातबारा किंवा 8 अ उतारा, यापैकी एक कागदपत्रं

जातीचा पुरावा दर्शवणारी आवश्यक कागदपत्रे

  • जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी ज्याचे प्रमाणपत्र काढायचे आहे त्याचे जात दर्शवणारे कागदपत्र आवश्यक असते. अर्जदार, त्याचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा,
  • अर्जदार अथवा अर्जदाराच्या वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला लागतो. हे उपलब्ध नसल्यास इतर कागदपत्रांपैकी एक कागदपत्रं सादर करावे लागते.
  • वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा
  •  वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्या जात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा
  • सामाजिक न्याय विभागाने जारी केलेले जात प्रमाणित करणारे कागदपत्र-अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र
  • ग्राम पंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत
  • जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे
  • सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे

जात प्रमाणपत्र काढताना एखादे कागदपत्र नसल्यास त्याऐवजी कोणते कागदपत्रं जोडायचे याची यादी आपले सरकार आणि शासनाच्या वेबसाईटवर मिळू शकते. किंवा नजीकच्या सेतू कार्यालयात संपर्क करा. आपले सरकार पोर्टलवर एकूण 52 प्रकारच्या कागदपत्रांची यादी देण्यात आली आहे त्यापैकी एक कागदपत्र सादर करावं लागते.

आपले सरकारवरुन अर्ज कसा करायचा?

 
आपले सरकारवर नवीन वापरकर्ता नोंदणी या लिंकवरुन नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून तुमचं लॉगीन तयार करुन घ्या. लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग पाहायला मिळतील त्यातून तुम्ही महसूल विभाग निवडा. त्यातून पुढे महसूल सेवा निवडा. तिथून जातीचे प्रमाणपत्र हा पर्याय निवडा. 

पुढे ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी वाचून घ्या, त्याप्रमाणं ती तयार ठेवा कारण ती वेबसाईटवर अपलोड करावे लागते. तिथुन पुढील वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती, पत्ता, किती वर्षांपासून त्या पत्त्यावर राहतो ती माहिती सादर करावी. 

18 वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तीचं प्रमाणपत्र काढायचं असेल तर लाभार्थ्याची माहिती तिथे माहिती सादर करावी. अपलोड करायची असलेली कागदपत्रे 75 केबी ते 500 केबीच्या दरम्यान असावीत.सर्व कागदपत्रे अपलोड करा. फोटो आणि सही देखील अपलोड करावेत. यानंतर अर्ज सादर करावा आणि अर्जाचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावा. जी पावती मिळेल ती सेव्ह करुन ठेवावी.

Leave a comment